शनिवार, २९ मार्च, २०२५

अहमदनगर शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाताना लागणारा सीना नदीवरील पूल म्हणजे लोखंडी पूल... 

       हा पूल काही इतर पुलांप्रमाणे नसून इंग्रजांनी बांधलेला ब्रिटिश स्थापनशास्त्राचा अजोड नमुना आहे.  या पुलाची उभारणी १८६९ ते १८७३ या दरम्यान झाली.  १२५ फुटाचा एक अशा आठ धनुष्याकृती ( बो ग्रीड ) लोखंडी कमानींच्या रचनेचा वापर करून वापरून यापुलाची निर्मिती केली गेली पुलाची लांबी ५३० फूट तर रुंदी १८ फूट आहे. आज पुलाच्या एका बाजूला आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळतो ज्यावर मेजर ई. जी.गॅम्बिएर  यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन झाल्याचा व पुलासाठी ९० हजार ३११ रुपये खर्च आल्याचा उल्लेख दिसतो. या पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्यावर तसे पत्र संबंधित ब्रिटिश कंपनीने नगरच्या तत्कालीन नगरपालिकेला पाठवून या लोखंडी पुलाची मुदत संपल्याचे कळविले होते. काही वर्षांपासून यावरची अवजड वाहतूक बदलून दुसरा पर्यायी पूल बांधण्यात आला आहे. आज दीड शतक ओलांडलेला हा लोखंडी पूल मात्र सुशोभीकरणाबाबत उपेक्षित दिसून येतो. 

किल्ल्यामागील हा 'लकडी पूल' जिमखान्याकडे जाण्याचा मार्ग म्हणून ओळखला जाई.  

       लोखंडी पुलाप्रमाणेच आणखी एक ब्रिटिशकालीन पूल अहमदनगर मध्ये भुईकोट किल्ल्यामागे भिंगारच्या लष्करी हद्दीत आहे. खाली दगडी काम आणि वर लाकडी कमानी असल्याने 'लकडी पूल' या नावाने तो ओळखला जातो. त्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद करून लष्कराने ' हेरिटेज ब्रिज' म्हणून त्याची जपवणूक करून लहानसे पर्यटन केंद्र बनवले आहे. 

    एका फकिराने दमडया साठवून ही मशीद बांधली अशी कथा आहे आणि अहमदनगरमधल्या या मशीदीची आशियातील आदर्श दहा मशिदीमध्ये गणना होते. 

       दगडांवरील अप्रतिम कोरीवकाम आणि कॅलिग्रॅफिसाठी प्रसिध्द असलेली एकमेव दमडी मशीद ही भुईकोट किल्ल्यापासून बुऱ्हानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लागते. आज तिच्या स्थापत्यरचनेमुळे आशियातील आदर्श दहा मशिदींमध्ये तिची गणना होते. निजामशाहीतल्या सरदार सहेल खान ( शेर खान ) याने इ.स. १५६७ मध्ये ही मशीद बांधली. दमडी हे तेव्हाचं चलनी नाण्याचं नाव. किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी तिथे एक फकिर बसत असे‍, अनेक दमड्या साठवून त्यातून त्याने किल्ल्याच्या मजूरांच्या मदतीने ही मशीद बांधली. आण‍ि तिचे नाव दमडी मशीद पडले. अशी आख्यायिका सांगतात.



 

   या मशिदीतील  विविध शैलींचा एकत्रित मिलाफ तिच्या स्थापत्यात आणखी सौंदर्यात भर पाडतो. मशिदीतील छताची व खाली फरशीची रचना जणू आरशात एकमेकांचे प्रतिबिंब उमटावे अशी एकसारखी आहे. मिनारावर तसेच दर्शनी भागात कमळाची फुले पाने रेखीव रित्या कोरलेली आहेत. आणि समोरच्या भिंतीमध्ये कुराणातील वचने, अरेबिक व पर्शियन मध्ये वेलबुट्टी सारखी नक्षी अप्रतिमरित्या कोरण्यात आली आहेत. मशिदीवरील संगमरवरी दगडावरील‍ कॅलिग्राफिचे काम आपल्याला थक्क करुन सोडते. या मशिदीच्या आवारात एक बारव असून त्यात एक कबर आहे. परिसरातही 









रविवार, २० जून, २०२१

जाणून घेऊयात 'टाळ' निर्मितीचा प्रवास...

    वारकरी म्हटला कि आपल्या समोर हातात टाळ घेतलेली व्यक्ती उभा राहते. वारकरी सांप्रदायात भजन कीर्तन जितके अनादी आहेत, तितकेच मृदंग, चिपळ्या व टाळ ही वाद्ये. टाळाशिवाय अभंगही अपूर्णच. 

    आज आपली परंपरा जपत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 'टाळ' वाद्याचा आवाज घुमतो. टाळ हे घनवाद्य म्हणजेच दोन वस्तूंच्या एकमेकांवरील आघाताने निर्माण होणाऱ्या नाद ध्वनीचे वाद्य.


     परंपरागत धार्मिक गोष्टींसाठी लागणाऱ्या पितळी वस्तूंची निर्मिती करणारा ' ओतारी समाज ' हा ' टाळ' वाद्य घडवण्याचे काम करतो. गेली कित्येक वर्षे मूर्ती, टाळ, घंटा, पंचपळी, पात्र, समई, दिवे यांची निर्मिती ते करत आहेत. टाळ बनविणारे कारागीर अहमदनगर, पंढरपूरमध्ये असून वारीची तयारी सुरु झाली कि या कारागिरांचे हातही टाळ निर्मितीत मग्न होतात. 
    टाळ या वाद्यातील सहजता, लहानसा घुमटाकृती आकार, गोलाकार हॅन्डल्स, गळ्यात अडकवण्यासाठी असलेली दोरी या समर्पक रचनेमुळे वर्षानुवर्षांच्या मूळ रचनेत जराही बदल झालेला नाही. सुरुवातीला जाडसर धातूच्या तुकड्यावर ठोके मारत त्याला आकार देत टाळ घडवले जाई. जे काहीसे जिकरीचे व कष्टदायी काम होते मात्र नंतर साचाच्या मदतीने ओतीवकाम करण्याच्या पद्धतीत टाळ बनायला सुरुवात झाली. 



    लहानशा एका भट्टीत तांबे (COPPER), कल्हईसाठीचा धातू-कथिल (TIN),  या धातूंना तापवून द्रव स्वरूप देतात. या तप्त द्रवातील धातूंच्या एका खास मिश्रणातूनच टाळ वाद्याच्या विशेष ध्वनीची गुणवत्ता ठरते. नंतर मातीच्या साहाय्याने बनवलेल्या (MOLDING)  साच्यात हा तप्त द्रव ओतून टाळ बनवले जातात. ओतकाम (CASTING) नंतर लेथ मशीनवर (lATHE MACHINE) घासकाम (POLISHING) आणि शेवटी FINISHING या प्रकियेंद्वारे टाळ वाद्याला पूर्ण स्वरूप मिळते. 
    पितळेप्रमाणे कांस्याचेही टाळ असतात. उत्कृष्ट नाद निर्मितीसाठी काशाचे टाळ उत्तम मानले जातात. अहमदनगरमधील हे काशाचे नगरी टाळ प्रसिद्ध आहेत. 



    दरवर्षी दिंडीतील भगवे पताके, हरीनाम गजर आणि साथीला टाळ, वीणा, मृदंग यांच्या संगीतासोबत साजऱ्या होणाऱ्या या वारीच्या सोहळ्यात 'टाळ' आपले स्वतंत्र अस्तित्व जपवून आहे. 

वैष्णवां घरी सर्वकाळ । सदा झणझणिती टाळ।।

    या तुकोबारायांच्या अभंगातील उक्तीप्रमाणे टाळ या वाद्यास असलेले अतिशय महत्वाचे स्थान व मागणी यामुळे टाळ निर्मितीचा हा पारंपारिक व्यवसाय आधुनिक काळातही उत्तमरित्या टिकून आहे. 



हा ब्लॉग आपणास आवडल्यास ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पोहचण्यासाठी नक्की शेअर करा.

धन्यवाद !!


Special thanks 

Images Courtesy : 
Sainath Gangadhar Dhudhale workshop.
Shri. Shubham Dhudhale. 
'Taal' instrument craftsman,
Ahmednagar +91 9657557156.



शनिवार, १२ जून, २०२१

मुलुख मैदान तोफ

         तुम्ही कधी अशा तोफेबद्दल ऐकले आहे का ?‍ ‍तिला ओढण्यासाठी 10 हत्ती, 400 बैल आणि शेकडो माणसांची ताकद लागायची. ऐकुन आश्चर्य वाटेल, पण अशी एक तोफ भारतात असून तिची निर्मिती अहमदनगरमध्येच झाली होती. चला तर मग जाणून घेऊया या भव्य तोफेविषयी.....

'मलिक ए मैदान' म्हणजेच 'युद्धभूमीचा कर्दनकाळ'!!
याच तोफेचे दुसरे नाव म्हणजे ' मुलुख मैदान तोफ '.  55 टन अजस्त्र वजनाच्या या तोफेला आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ मानली जाते आणि ही  तोफ महाराष्ट्रात अहमदनगरच्या  भूमीतच घडवली गेली.

 
प्रस्तुत छायाचित्र हेन्री वेलिंग्टन यांनी १८६० काढलेले आहे. 

    अहमदनगर हे मध्ययुगीन इतिहासातील अनेक सत्तांतरामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे शहर होते. निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद हा स्वत: उत्तम लढवय्या होता. त्याचा मुलगा बुऱ्हाणशहाने निजामशाहीचे वैभव आणखी वाढवले. त्याने त्याच्या काळात 1549 मध्ये धातुशास्त्रात पारंगत तुर्की सरदार रुमीखान दख्खनी याच्याकडून मुलुख-मैदान नावाची तोफ एकसंध ओतीव कामात गाळून घेतली.
 

    55 टन वजनाची ही अजस्त्र तोफ लोह-तांबे-जस्त यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आली. तिचे मुख अक्राळविक्राळ मगरीच्या उघडलेल्या जबड्यासारखे आहे व यावर सिंहाकृती मुखात हत्तीचे रेखीव उठावशिल्प पाहायला मिळते. 14 फूट लांब, 4 इंच जाडी व 4 फूट 11 इंच व्यासाची ही तोफ इतकी अवजड आहे की तिला वाहून नेण्यासाठी दहा हत्ती, चारशे बैल लागत. या तोफेचा वापर प्रसिध्द विजयनगरच्या युध्दात केला गेला. या तोफेच्या पहिल्याच माऱ्याने सुमारे 5000 सैनिक गारद झाले तर आवाजाच्याच भितीने इतर सैन्य पळून गेले आणि लढाईत या तोफेमुळे‍ निजामाने एकहाती विजय मिळवला. 


            पुढे दिल्लीहुन  औरंगजेब  आला आणि त्याने आदिलशाहीचा पराभव केला तेव्हा ही तोफ दिल्लीला नेण्याची त्याची इच्छा होती. मात्र तोफेच्या अवजड वजनामुळे ते शक्य झाली नाही. तेव्हा त्याने त्यावर शिलालेखाप्रमाणे कोरून  घेतले कि " ही मैदान गाजवणारी प्रचंड तोफ आता या आलमगिराने जिंकून घेतली आहे ". आज या तोफेवर दोन लेख आहेत. एक रुमीखान याचा तोफ निर्मितीचा आणि दुसरा औरंगजेबचा. आता ही तोफ विजापूरच्याच किल्ल्यावर आहे.
    असं सांगतात कि, या तोफेचा हादरा व मोठ्या आवाजापासून  तोफ डागणाऱ्याचं संरक्षण व्हावं म्हणून त्या काळात तोफे जवळ एक पाण्याने भरलेला मोठा हौद बांधण्यात येई. तोफेची बत्ती पेटवल्यावर सैनिक या हौदात उडी घ्यायचे. मलिक-ए-मैदान तोफेबद्दलची आणखी एक अख्यायिका म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारत विजयाचे प्रतिक म्हण‍ून व्हिक्टोरिया राणीला भेट देण्यासाठी इंग्लंडला नेणार होते यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले पण तोफेच्या  वजनामुळे  शक्य झाले नाही.



     "मलिक-ए-मैदान" ही तोफ निजामशाहच्या प्रसिद्ध तोफखान्याचाच एक भाग. त्याचबरोबर नौ गजी, हवाई, तोफ-ए-हैदरी या आणि अशा बऱ्याच तोफांची अहमदनगरच्या मुशीत निर्मिती झाली. पुढे निजामशाहीच्या उत्तरार्धात 12 ऑगस्ट 1803 रोजी अहमदनगरचा अभेद्य किल्ला ब्रिटिशांनी फंदफितुरीने ताब्यात घेतला. काडतुसे बनवण्याचा कारखाना व बॉम्बे आर्टिलरी ॲण्ड लॅबोरेटरी ब्रिटिशांनी येथेच चालू केले. तेव्हाही भुईकोट किल्ला इंग्रज लष्कराचे महत्त्वाचे केंद्र होते.
       आजही अहमदनगर शहर DRDO, MIRC, ACC School यांद्वारे भारतीय लष्करात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Ahmednagar Fort

धन्यवाद!!


Images: Old India postcard auction, London. and Internet.








शुक्रवार, ११ जून, २०२१

पारंपारिक धातुकामाचे एक भांडार : तांबट आळी

 

        ठक…. ठक…..ठक…. असा लयबद्ध ध्वनी आपल्याला तांबट आळीत पोहोचण्यापूर्वीच कानावर पडतो. त्या आवाजातील शांत लहरीची भावना, तिथल्या वाड्यांचं जुनंपण आणि धातूच्या पत्र्यापासून सुंदर कलाकृती उदयाला येतानाचा प्रवास आपल्याला मंत्रमुग्ध करतो. हंडा, कळशी, घंगाळ, ताम्रकलश, बंब, यांसारख्या पूर्वापार चालत आलेल्या वस्तूंची निर्मिती इथे होते. पारंपरिक कौशल्याने प्रथम धातूचा पत्रा गरम करणे (Annealing), त्यास आकार देणे (Shaping) आणि शेवटी ‘मठारकाम’ म्हणजेच पत्र्यावर एकसारखे ठोके देत त्यावर प्रमाणबध्द आणि आकर्षक असे रुप देऊन त्यास आणखी मजबूती देणे हे इथले महत्वाचे वैशिष्ट्य.


    इतिहासात मागे वळून पाहताना 300–400 वर्षे जुने असे या तांबट आळीतील धातूच्या कामाचे संदर्भ मिळतात. बारा बलुतेदार सामाजिक व्यवस्थेचा भाग असणारी तांबट ही लोक कोकणातून पुण्यात आल्याचे समजते, अन् पेशवे काळात इथे पितळ आणि तांबे निर्मित कौशल्यपुर्ण वस्तूंची भरभराट सुरु झाली. त्यांची भूमिका ही पेशव्यांच्या धार्मिक, आर्थिक आणि लष्करी गरजा भागवणे ही होती. यात तांब्याची नाणी, स्वयंपाकातील व सजावटीची भांडी ते सैन्यासाठी शस्त्रे यांची तांबट यांनी निर्मिती व भारतभर व्यापारही केला.                                                                                                          शतकानुशतके असलेला धातूंच्या भांड्यांचा वापर, त्यांची उपयुक्तता, टिकाऊपणा आणि संचित असे आरोग्यकारक साधननिर्मिती करणारे म्हणून तांबट आळीतील कारागिरांनी आपले स्थान टिकवून ठेवले असले तरी मात्र या सुंदर व तंत्रज्ञानालाही आश्चर्यचकित करणारे कारागिरांचे मानांकित कसब हे सध्या अल्पशा कारागिरांच्या हाती उरले आहे. आता ही कलात्मक परंपरा पुनरुजीवित करण्याची गरज आहे. या व्यवसायावर यांत्रिक युगाचे आक्रमण झाले असून त्याचा प्रतिकूल परिणाम जाणवत आहे. तांबे, पितळाचे वाढते दर, स्टेनलेस स्टील आणि प्लॅस्टिकचा वाढता वापर यामुळे या व्यवसायाकडे नवीन तरुण पिढीही पाठ फिरवताना दिसते. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात असणाऱ्या तांबट कुटूंबातील कारागिरांची संख्या ही आता 90% हून जास्त घटली असून आता तांबट आळीत मोजकेच कारखाने उरले आहेत.


( तांबट आळीतील कारागीर काम करताना व त्यांची पारंपरिक अवजारे )

    हंडा, कळशी, पात्रे या पूर्वापार चालत आलेल्या वस्तूंबरोबरच ‘गृहसजावटीच्या कलाकृती’ (Interior Artworks) यांचीही तांबट यांनी निर्मिती सुरु केल्यास आधुनिक तंत्रज्ञानासोबत योग्य मार्गदर्शनाने हाच ऱ्हास होत चाललेला व्यवसाय नव्या जोमाने उभारी घेतल्याशिवाय राहणार नाही. कायमच अंधारात राहणारे या पारंपरिक कुशल कारागीरांना तंत्रज्ञानासोबत जाहिराती, प्रदर्शने, लेख, मुलाखत यांची गरज असून कलारसिक व सर्वसामान्यांनी पुढे येऊन पाठबळ दिल्यास नक्कीच येथील धातूकामाच्या निपुण कौशल्यांचे भविष्य आशाजनक असेल.



पारंपरिक भांडी व वस्तूंबरोबर आता तांबट आळीमध्ये काळानुसार बदलत नवीन भांडी ही बनवत आहेत.


Images: Studiocoppre and Internet

    हा लेख धातुकामाचा इतिहास व कलेबद्दलच्या काही माझ्या शैक्षणिक अभ्यासानुसार लिहिला असून यात काही त्रुटी असू शकतात. आपल्या मार्गदर्शक सूचनांचे स्वागत आहे. 

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

 


                  मंदिरातला तो....

काय माहित खरंच का ? 
मी त्याच्या नवसाने जन्मलोय......ते!

सकाळी दरवाजा उघडला
कि तो समोरच.....

पण तो कधीच मला
स्वतःहून बोलवत नव्हता 
आणि मी त्याला...

मला धार्मिकतेचा यायचा राग
आणि त्याच्या भक्तांची कीव.

शीतयुद्ध चालत 
असेल आमच्यात,

त्याच्या भोवतीच्या 'विश्वस्तांचा'
भ्रष्टाचारही मी 'याचि डोळा'
पाहायचो...

रात्री पाहायचो 
एकटा त्याला...

दिवसभराच्या गराड्यातून 
शेंदुराच्या थरात
तेलाच्या वंगणातून 
डोळे बोलायचे मात्र त्याचे.

सताड त्याचा उघडलेला दरवाजा दिसे रात्री अंधारात
आणि सताड माझे प्रश्न...

मी  फिरायचो इकडे तिकडे 
बदलायचो खूप रंग सरडयासारखे,
तरीही मी त्याचा भक्त होतो.
कारण तो त्याच्या जागी 
तसाच ठाम होता 
एकाच रंगाचा ....  


  दिनांक २७-४-१८                           



बुधवार, ११ एप्रिल, २०१८

SELF AND WE

काय ते झुकेरबर्गच्या मनात
आले काय ठाऊक ?
डोक्याचे दुखणे 
जगाच्या बाजारात STATUS वर येऊ लागलेय
अजब आहे सोशल मीडिया .....
हे त्याच गोष्टी इतरांना दाखवते,
जे तुम्ही दाखवू इच्छिता.....
सकाळी उठल्यावर प्रथम
काय पाहता बरे ?
भीती  वाटते ना, ACTIVE नाही राहिलो
तर एकटे पडू .
या VIRTUAL जगात.
लटकून ........अडकून गेलोय
आपण FB,INSTA,WHATSAPP
 खुंटयाना.....!!
 का केविलवाणी प्रयत्न करतायेत 
आपली LIFE किती SO CALLED - COOL,AWESOME,
 छान,सुंदर..........आहे ते दाखवण्याची !!







                                                         11-4-2018
                                                        

शुक्रवार, २३ मार्च, २०१८

           
ताकद लागते  ठाम उभे राहायला ही. . . .
आयुष्यात सभ्यपणा दाखवण्यासाठी ही 
कधीकधी धैर्य लागते. . . .

जिंकायला ही ताकद लागते
तर शरण जाण्यासाठी धैर्य लागते. . . . . . 

खात्रीसाठी ताकद 
तर शंकेसाठी धैर्य लागते. . .

स्वतःच्या वेदनेस तोंड देण्यासाठी
ही धैर्य लागते. . . . 
आणि 
मित्राची वेदना जाण्यासाठी 
ही ताकद लागते. . . . 








                                                 ...Incomplete

                                                                         25-3- 2018