तुम्ही कधी अशा तोफेबद्दल ऐकले आहे का ? तिला ओढण्यासाठी 10 हत्ती, 400 बैल आणि शेकडो माणसांची ताकद लागायची. ऐकुन आश्चर्य वाटेल, पण अशी एक तोफ भारतात असून तिची निर्मिती अहमदनगरमध्येच झाली होती. चला तर मग जाणून घेऊया या भव्य तोफेविषयी.....
'मलिक ए मैदान' म्हणजेच 'युद्धभूमीचा कर्दनकाळ'!!
याच तोफेचे दुसरे नाव म्हणजे ' मुलुख मैदान तोफ '. 55 टन अजस्त्र वजनाच्या या तोफेला आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ मानली जाते आणि ही तोफ महाराष्ट्रात अहमदनगरच्या भूमीतच घडवली गेली.
प्रस्तुत छायाचित्र हेन्री वेलिंग्टन यांनी १८६० काढलेले आहे.
अहमदनगर हे मध्ययुगीन इतिहासातील अनेक सत्तांतरामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे शहर होते. निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद हा स्वत: उत्तम लढवय्या होता. त्याचा मुलगा बुऱ्हाणशहाने निजामशाहीचे वैभव आणखी वाढवले. त्याने त्याच्या काळात 1549 मध्ये धातुशास्त्रात पारंगत तुर्की सरदार रुमीखान दख्खनी याच्याकडून मुलुख-मैदान नावाची तोफ एकसंध ओतीव कामात गाळून घेतली.
55 टन वजनाची ही अजस्त्र तोफ लोह-तांबे-जस्त यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आली. तिचे मुख अक्राळविक्राळ मगरीच्या उघडलेल्या जबड्यासारखे आहे व यावर सिंहाकृती मुखात हत्तीचे रेखीव उठावशिल्प पाहायला मिळते. 14 फूट लांब, 4 इंच जाडी व 4 फूट 11 इंच व्यासाची ही तोफ इतकी अवजड आहे की तिला वाहून नेण्यासाठी दहा हत्ती, चारशे बैल लागत. या तोफेचा वापर प्रसिध्द विजयनगरच्या युध्दात केला गेला. या तोफेच्या पहिल्याच माऱ्याने सुमारे 5000 सैनिक गारद झाले तर आवाजाच्याच भितीने इतर सैन्य पळून गेले आणि लढाईत या तोफेमुळे निजामाने एकहाती विजय मिळवला.
पुढे दिल्लीहुन औरंगजेब आला आणि त्याने आदिलशाहीचा पराभव केला तेव्हा ही तोफ दिल्लीला नेण्याची त्याची इच्छा होती. मात्र तोफेच्या अवजड वजनामुळे ते शक्य झाली नाही. तेव्हा त्याने त्यावर शिलालेखाप्रमाणे कोरून घेतले कि " ही मैदान गाजवणारी प्रचंड तोफ आता या आलमगिराने जिंकून घेतली आहे ". आज या तोफेवर दोन लेख आहेत. एक रुमीखान याचा तोफ निर्मितीचा आणि दुसरा औरंगजेबचा. आता ही तोफ विजापूरच्याच किल्ल्यावर आहे.
असं सांगतात कि, या तोफेचा हादरा व मोठ्या आवाजापासून तोफ डागणाऱ्याचं संरक्षण व्हावं म्हणून त्या काळात तोफे जवळ एक पाण्याने भरलेला मोठा हौद बांधण्यात येई. तोफेची बत्ती पेटवल्यावर सैनिक या हौदात उडी घ्यायचे. मलिक-ए-मैदान तोफेबद्दलची आणखी एक अख्यायिका म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारत विजयाचे प्रतिक म्हणून व्हिक्टोरिया राणीला भेट देण्यासाठी इंग्लंडला नेणार होते यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले पण तोफेच्या वजनामुळे शक्य झाले नाही.
"मलिक-ए-मैदान" ही तोफ निजामशाहच्या प्रसिद्ध तोफखान्याचाच एक भाग. त्याचबरोबर नौ गजी, हवाई, तोफ-ए-हैदरी या आणि अशा बऱ्याच तोफांची अहमदनगरच्या मुशीत निर्मिती झाली. पुढे निजामशाहीच्या उत्तरार्धात 12 ऑगस्ट 1803 रोजी अहमदनगरचा अभेद्य किल्ला ब्रिटिशांनी फंदफितुरीने ताब्यात घेतला. काडतुसे बनवण्याचा कारखाना व बॉम्बे आर्टिलरी ॲण्ड लॅबोरेटरी ब्रिटिशांनी येथेच चालू केले. तेव्हाही भुईकोट किल्ला इंग्रज लष्कराचे महत्त्वाचे केंद्र होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा