अहमदनगर शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाताना लागणारा सीना नदीवरील पूल म्हणजे लोखंडी पूल...
हा पूल काही इतर पुलांप्रमाणे नसून इंग्रजांनी बांधलेला ब्रिटिश स्थापनशास्त्राचा अजोड नमुना आहे. या पुलाची उभारणी १८६९ ते १८७३ या दरम्यान झाली. १२५ फुटाचा एक अशा आठ धनुष्याकृती ( बो ग्रीड ) लोखंडी कमानींच्या रचनेचा वापर करून वापरून यापुलाची निर्मिती केली गेली पुलाची लांबी ५३० फूट तर रुंदी १८ फूट आहे. आज पुलाच्या एका बाजूला आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळतो ज्यावर मेजर ई. जी.गॅम्बिएर यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन झाल्याचा व पुलासाठी ९० हजार ३११ रुपये खर्च आल्याचा उल्लेख दिसतो. या पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्यावर तसे पत्र संबंधित ब्रिटिश कंपनीने नगरच्या तत्कालीन नगरपालिकेला पाठवून या लोखंडी पुलाची मुदत संपल्याचे कळविले होते. काही वर्षांपासून यावरची अवजड वाहतूक बदलून दुसरा पर्यायी पूल बांधण्यात आला आहे. आज दीड शतक ओलांडलेला हा लोखंडी पूल मात्र सुशोभीकरणाबाबत उपेक्षित दिसून येतो.
किल्ल्यामागील हा 'लकडी पूल' जिमखान्याकडे जाण्याचा मार्ग म्हणून ओळखला जाई.
लोखंडी पुलाप्रमाणेच आणखी एक ब्रिटिशकालीन पूल अहमदनगर मध्ये भुईकोट किल्ल्यामागे भिंगारच्या लष्करी हद्दीत आहे. खाली दगडी काम आणि वर लाकडी कमानी असल्याने 'लकडी पूल' या नावाने तो ओळखला जातो. त्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद करून लष्कराने ' हेरिटेज ब्रिज' म्हणून त्याची जपवणूक करून लहानसे पर्यटन केंद्र बनवले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा