शनिवार, २९ मार्च, २०२५

अहमदनगर शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाताना लागणारा सीना नदीवरील पूल म्हणजे लोखंडी पूल... 

       हा पूल काही इतर पुलांप्रमाणे नसून इंग्रजांनी बांधलेला ब्रिटिश स्थापनशास्त्राचा अजोड नमुना आहे.  या पुलाची उभारणी १८६९ ते १८७३ या दरम्यान झाली.  १२५ फुटाचा एक अशा आठ धनुष्याकृती ( बो ग्रीड ) लोखंडी कमानींच्या रचनेचा वापर करून वापरून यापुलाची निर्मिती केली गेली पुलाची लांबी ५३० फूट तर रुंदी १८ फूट आहे. आज पुलाच्या एका बाजूला आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळतो ज्यावर मेजर ई. जी.गॅम्बिएर  यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन झाल्याचा व पुलासाठी ९० हजार ३११ रुपये खर्च आल्याचा उल्लेख दिसतो. या पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्यावर तसे पत्र संबंधित ब्रिटिश कंपनीने नगरच्या तत्कालीन नगरपालिकेला पाठवून या लोखंडी पुलाची मुदत संपल्याचे कळविले होते. काही वर्षांपासून यावरची अवजड वाहतूक बदलून दुसरा पर्यायी पूल बांधण्यात आला आहे. आज दीड शतक ओलांडलेला हा लोखंडी पूल मात्र सुशोभीकरणाबाबत उपेक्षित दिसून येतो. 

किल्ल्यामागील हा 'लकडी पूल' जिमखान्याकडे जाण्याचा मार्ग म्हणून ओळखला जाई.  

       लोखंडी पुलाप्रमाणेच आणखी एक ब्रिटिशकालीन पूल अहमदनगर मध्ये भुईकोट किल्ल्यामागे भिंगारच्या लष्करी हद्दीत आहे. खाली दगडी काम आणि वर लाकडी कमानी असल्याने 'लकडी पूल' या नावाने तो ओळखला जातो. त्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद करून लष्कराने ' हेरिटेज ब्रिज' म्हणून त्याची जपवणूक करून लहानसे पर्यटन केंद्र बनवले आहे. 

    एका फकिराने दमडया साठवून ही मशीद बांधली अशी कथा आहे आणि अहमदनगरमधल्या या मशीदीची आशियातील आदर्श दहा मशिदीमध्ये गणना होते. 

       दगडांवरील अप्रतिम कोरीवकाम आणि कॅलिग्रॅफिसाठी प्रसिध्द असलेली एकमेव दमडी मशीद ही भुईकोट किल्ल्यापासून बुऱ्हानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लागते. आज तिच्या स्थापत्यरचनेमुळे आशियातील आदर्श दहा मशिदींमध्ये तिची गणना होते. निजामशाहीतल्या सरदार सहेल खान ( शेर खान ) याने इ.स. १५६७ मध्ये ही मशीद बांधली. दमडी हे तेव्हाचं चलनी नाण्याचं नाव. किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी तिथे एक फकिर बसत असे‍, अनेक दमड्या साठवून त्यातून त्याने किल्ल्याच्या मजूरांच्या मदतीने ही मशीद बांधली. आण‍ि तिचे नाव दमडी मशीद पडले. अशी आख्यायिका सांगतात.



 

   या मशिदीतील  विविध शैलींचा एकत्रित मिलाफ तिच्या स्थापत्यात आणखी सौंदर्यात भर पाडतो. मशिदीतील छताची व खाली फरशीची रचना जणू आरशात एकमेकांचे प्रतिबिंब उमटावे अशी एकसारखी आहे. मिनारावर तसेच दर्शनी भागात कमळाची फुले पाने रेखीव रित्या कोरलेली आहेत. आणि समोरच्या भिंतीमध्ये कुराणातील वचने, अरेबिक व पर्शियन मध्ये वेलबुट्टी सारखी नक्षी अप्रतिमरित्या कोरण्यात आली आहेत. मशिदीवरील संगमरवरी दगडावरील‍ कॅलिग्राफिचे काम आपल्याला थक्क करुन सोडते. या मशिदीच्या आवारात एक बारव असून त्यात एक कबर आहे. परिसरातही